चीनची धडकी भरायला लावणारे सैन्य सीमेवर तैनात

Foto
चीनने आता सीमेवर केलेल्या प्रत्येक चुकीची किंमत मोजायला लावण्यासाठी भारतीय सैन्य सज्ज झाले आहे. कोणत्याही शत्रूला धडकी भरेल एवढ्या मोठ्या प्रमाणात सैन्य चीनच्या सीमेवर तैनात करण्यात आलं आहे. सीमेवर कायम शांतता राखण्यासाठी भारताने कधीही आक्रमकता दाखवली नाही. पण सातत्याने चीनकडून भारताच्या भूभागावर केला जाणारा दावा पाहता भारतीय सैन्याने दीर्घ काळापासून चालत आलेलं शांत राहण्याचे धोरण बदलले  असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली.
भारतीय भूभागात चालत येण्याचे पिपल्स लिबरेशन आर्मीचे दिवस आता संपले आहेत, अशी प्रतिक्रिया सूत्राने टाइम्स ऑफ इंडियाला दिली. प्रत्यक्ष नियंत्रण रेषा म्हणजेच 3488 किमीच्या एलएसीवर भारतीय सैन्य आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या हाय अलर्टवर आहे. गलवान खोर्‍यापासून ते सर्व वादग्रस्त जागांवर तैनाती वाढवण्यात आली आहे. दुसरीकडे चीननेही सैन्य वाढवलं आहे. गलवान खोरे, दौलत बेग ओल्डी, डेप्सांग, चुशुल आणि पूर्व लडाखसारख्या भागात चीनने सैन्य वाढवले आहे.
कोणत्याही आकस्मिकतेला तोंड देण्याची पूर्ण तयारी ठेवत युद्धजन्य अलर्ट देण्यात आला आहे. अरुणाचल प्रदेश ते लडाखपर्यंत संपूर्ण सीमेवर भारतीय सैन्य अशाच प्रकारच्या अलर्टवर आहे. कोणत्याही अस्वस्थतेतून नव्हे, तर पूर्ण तयारीसह सज्ज होत हा अलर्ट देण्यात आलेला आहे. पूर्व लडाखमध्ये 15 हजार सैनिक तैनात आहेत. तर मागच्या भागात या सैनिकांना कव्हर म्हणूनही अनेक तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. ’आपले सैनिक एक पाऊलही आता मागे सरकणार नाहीत. प्रादेशिक अखंडतेबाबत कोणतीही तडजोड होणार नाही. दीर्घ काळापासून चीनने अनेकदा आक्रमकपणाचा खेळ खेळला आहे. ते आमच्या प्रदेशात उल्लंघन करतात, भूभागावर दावे करतात आणि आम्हीच खरे आहोत, असं सांगतात. मग भारताला आक्रमक म्हणून रंगवतात’, अशी प्रतिक्रिया सूत्राने दिली. चीनची ही वागणूक आता बिलकुल सहन केली जाणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यातील बैठकीनंतर हे कडक निर्देश आल्याची माहिती आहे.सीमेवरील पुढच्या भागात शस्त्र न बाळगण्याच्या भारताच्या धोरणाबाबतही पुन्हा विचार केला जाणार असल्याची माहिती आहे. कारण, चीनकडून वारंवार या प्रोटोकॉलचं उल्लंघन केले जात आहे. 2013 च्या सीमा संरक्षण समन्वय करारासह चीनने अनेक प्रोटोकॉल तोडले असल्याचं भारताचे मत आहे. चीन सैन्याकडून वारंवार भारतीय सीमेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला जातोय. यापूर्वी डोकलाममध्येही असाच प्रकार घडला होता. 2016 मध्ये चीनकडून 296 वेळा घुसखोरी करण्यात आली, 2017 मध्ये 473, तर 2018 मध्ये 404 वेळा घुसखोरीचा प्रयत्न झाला. गलवान खोरे आणि नाकू ला सेक्टरसारख्या भागांमध्ये चीनकडून वारंवार घुसखोरीचे प्रयत्न करत आक्रमकता दाखवली जात आहे.

भारत रडत बसणार नाही - मोदी

दरम्यान कोणत्याही संकट प्रसंगी भारत रडत बसणार नाही. संकटाकडे एक संधी म्हणून भारत पाहातो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्पष्ट केले. कोळसा खाणीच्या लिलाव प्रक्रियेला आज सुरुवात करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. कोरोना संकटाच्या काळात देशाने आत्मनिर्भर होत जगासमोर आदर्श ठेवला असे ते म्हणाले.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker